कायमस्वरुपी मुबलक पाण्यासाठी जलयुक्त शिवार अभियान आवश्यक-विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे औरंगाबाद,- गावांमध्ये कायमस्वरुपी मुबलक पाणी उपलब्ध होण्यासाठी जलयुक्त शिवार अभियान ही महत्वाकांक्षी योजना राज्यात मोठ्या प्रमाणात यशस्वी ठरली आहे. हे यश टिकवण्यासाठी ही योजना सातत्यपूर्णरित्या राबविणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी येथे केले.मराठवाडा महसूल प्रशिक्षण प्रबोधिनी येथे आयोजीत जलयुक्त शिवार अभियानांतर्गत सन 2015-16 मध्ये उत्कृष्ट योगदान दिलेल्या जिल्हा, तालुका, गाव, पत्रकार व अधिकारी कर्मचारी यांच्या पुरस्कार वितरण कार्यक्रमात श्री.बागडे अध्यक्षीय स्थानावरुन बोलत होते.यावेळी व्यासपीठावर फुलंब्री तालुक्याचे नगराध्यक्ष श्री.शिरसाठ,जिल्हाधिकारी उदय चौधरी,जिल्हा कृषी अधीक्षक पी.एस.मोटे यांच्यासह इतर मान्यवर ,संबंधित अधिकारी उपस्थित होते.श्री.बागडे यावेळी म्हणाले की,पाण्याचा मुबलक साठा ही आजच्या काळात आनंदाची बाब झाली आहे. ग्रामीण भागात पुरेसा पाणीसाठा उपबल्ध करुन देण्याच्या व्यापक उद्देशाने राज्य शासनाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदशर्नाखाली राज्यात जलयुक्त शिवार अभियान ही महत्वाकांक्षी योजना राबवण्यास सुरवात केली . योजनेच्या पहिल्याच वर्षात यंत्रणा आणि लोकसहभागातुन उल्लेखनीय काम आपण उभे केले आहे.त्यामध्ये उत्कृष्ट योगदान देणा-यांचा आज गौरव होत आहे ही त्यांच्या कामासाठी योग्य पावती असून हा पुरस्कार भविष्यात ही याच पद्धतीने सातत्य ठेवत आपल्याला अधिक भरीव व्यापक काम करण्याची प्रेरणा देणारा आहे,असे सांगून श्री.बागडे म्हणाले की, लोककल्याणासाठी शासन नेहमीच नाविन्यपूर्ण उपयुक्त योजना राबवत असते . योजनांचे यश हे लोकांनी यंत्रणेच्या सोबतीने त्यात सहभागी होण्यावर मोठ्या प्रमाणात अवंलबून असते.त्या पार्श्वभूमीवर जलयुक्त शिवार अभियानातून लोकसहभागातून आतापर्यंत 36 हजार कोटी रु.कामे झाली आहेत.यामध्ये विविध स्वंयसेवी संस्था,लोकसहभाग आणि यंत्रणेचे भरीव प्रयत्न या गोष्टी महत्वाच्या ठरल्या आहेत.पावसातुन प्राप्त होणारे पाणी हा आपल्या पाण्याचा एकमेव स्त्रोत आहे हे लक्षात घेऊन पावसाचे पाणी जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात कसे अडवता येईल,आपल्या शेतीत,गावात,मातीत कसे जिरवता येईल,वाहुन जाणारे पाणी वेळीच अडवुन त्यातुन पुढे लागणा-या पाण्याचा साठा कसा तयार करता येईल या व्यापक जाणीवेतुन आपण प्रयत्नशील राहण्याची गरज आहे.त्यासाठीच शासनाने मागेल त्याला शेततळे ही उपयुक्त योजना मोठ्या स्वरुपात राबवण्यास प्राधान्य दिले आहे.राज्यात औरंगाबाद जिल्हा त्यात प्रथम स्थानावर आहे ही आपल्या साठी निश्चितच आनंदाची बाब आहे. गावांना जलयुक्त शिवारामुळे आपण कायम स्वरुपी टॅंकरमुक्त करु शकतो.त्यासाठी सगळ्यांनी भरीव प्रयत्न करावे ,असे सांगून श्री.बागडे यांनी यावेळी शेतक-यांनी आर्वजुन शेतकरी अपघात विमा योजना तसेच अटल पेन्शन योजनांचा ही लाभ घ्यावा असे आवाहनही यावेळी केले. जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी यावेळी, जलयुक्त शिवार अभियान,मागेल त्याला शेततळे यासह इतर सर्व कल्याणकारी योजनांमध्ये जिल्हा कायम अग्रेसर ठेवण्यासाठी सर्वांनी अशाच उत्सुर्फतपणे सहभागी होण्याचे आवाहन करुन पुरस्कार प्राप्त सर्वांचे अभिनंदन यावेळी केले.या वेळी विभाग तसचे जिल्हास्तरावरील पुरस्काराचे वितरण करण्यात आले.यामध्ये विभाग स्तरावर उत्कृष्ट काम करणारा जिल्हा म्हणून राजमाता जिजाऊ जलमित्र पुरस्कारामध्ये औरंगाबाद जिल्ह्यास व्दितीय पुरस्कार (रक्कम 5 लाख रु.) (विभागून) व खुलताबाद तालुक्यास व्दितीय पुरस्कार (विभागून ) देण्यात आले. जिल्हास्तरावर उत्कृष्ट काम करणा-या तालुक्यांचे पुरस्कार पुढील प्रमाणे खुलताबाद प्रथम (5 लाख रु.)औरंगाबाद तालुका व्दितीय (3 लाख रु.) तर जिल्ह्यामध्ये उत्कृष्ट काम करणारे गावांसाठीच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलमित्र पुरस्कार मौजे महालपिंप्री, तालुका औरंगाबाद प्रथम (1 लाख रु.), मौजे पाचोड बु. तालुका पैठण व्दितीय (75 हजार रु.), फुलंब्री , तालुका फुलंब्री तृतीय पुरस्कार( 50 हजार रु.), मौजे बाजार सावंगी, तालुका खुलताबाद चौथा पुरस्कार (30 हजार रु. )व मौजे पालखेड, तालुका वैजापूर यांना पाचव्या क्रमांकाच्या पुरस्काराने (20हजार रु.) गौरवण्यात आले. पत्रकारांसाठीचा प्रथम पुरस्कार (15 हजार रु.) विजय एकनाथ चौधरी, दैनिक महाराष्ट्र टाईम्स यांना तर द्वितीय पुरस्कार (12 हजार रु.) श्रीमती प्रतिक्षा श्रीनिवास परिचारक, उपसंपादक साप्ताहिक आधुनिक किसान यांना देण्यात आला. उत्कृष्ट अधिकारी म्हणून अशोक साहेबराव कोंडे, तत्कालीन तालुका कृषी अधिकारी औरंगाबाद यांना गौरविण्यात आले. कार्यक्रमास विजेत्या गावाचे सरपंच, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक , तलाठी ,संबंधीत तालुक्याचे उप विभागीय अधिकारी (प्रांत), उप विभागीय कृषी अधिकारी, तहसिलदार, तालुका कृषी अधिकारी, गट विकास अधिकारी यांच्यासह ग्रामस्थ,संबंधित अधिकारी कर्मचारी मोठ्यासंख्येने उपस्थित होते.