सुरक्षितरित्या कीटकनाशक फवारणी,बोंडअळी नियंत्रणासाठी व्यापक जनजागृती करा जिल्हाधिकारी उदय चौधरी यांचे आदेश औरंगाबाद, – कापसावर होणारा बोंडअळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तसेच सुरक्षितरित्या कीटकनाशक फवारणीच्या दृष्टीने शेतकरी, शेतकमजुरांमध्ये व्यापक जनजागृती करावी अशा सूचना जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी येथे दिल्या.कीटकनाशक विषबाधा संनियंत्रण व कापूस पिकावरील शेंदरी बोडअळीसाठीच्या नियंत्रणासाठी जिल्हास्तरीय बैठकीचे आयोजन 24 सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात करण्यात आले होते. यावेळी जिल्हाधिकारी बोलत होते. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी टी.एस. मोटे, जिल्हा परिषदेचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी ए.व्ही. गंजेवार, जिल्हा कृषी अधिकारी यांच्यास‍‍ह कीटकनाशक औषधी कंपन्याचे प्रतिनिधी, जिंनिंग प्रेसिंग असोसिएसनचे पदाधिकारी यांची उपस्थिती होती. बोंडअळीसह इतर किडींचा कापसावरील प्रादुर्भाव वाढला असून तालुकास्तरावरील पथकांनी बाधीत गावांना भेटी देऊन तपासणी करण्याबरोबरच कीटकनाशक फवारणी करतेवेळी शेतकऱ्यांसह मजूरांनी घ्यावयाची काळजी याबाबात त्यांना मार्गदर्शन करावे असे जिल्हाधिकारी यांनी सांगितले. फवारणीच्या वेळी मजूरांना मास्क, कपडे यांच्यासह उपयुक्त साधणे वापरणे बंधनकारक करण्यात यावे. यासाठी शेतकऱ्यांसह मजुरांची तालुकास्तरावर कार्यशाळा घेऊन त्यांना जागरूक करणे आवश्यक आहे. यासाठी शेतकरी व मजूरांचा जाण्या-येण्याचा खर्च प्रशासनाच्या वतीने करण्यात येईल असेही त्यांनी सांगितले. कीटकनाशक फवारणी करताना औषधींची मात्रा किती असावी यास‍ह इतर उपयुक्त माहिती असलेली घडीपुस्तिकेचे वाटप शेतकरी, मजूर यांना करण्यात यावे. शेतकऱ्यांच्या सहकार्याने जनजागृती कार्यक्रम राबवण्याबरोबरच प्रत्येक शेतकऱ्याची माहिती जिल्हा कृषी यंत्रणेकडे असणे बंधनकारक असून सामान्य आरोग्य यंत्रणांनी फवारणी दरम्यान झालेल्या विषबाधेचा अहवाल प्रशासनाला देणे गरजेचे आहे असे जिल्हाधिकारी श्री.चौधरी यांनी सांगितले