विशेष संक्षिप्त मतदान पुनर्निरीक्षण कार्यक्रमामध्ये परभणी जिल्ह्यातील नागरिकांनी सहभागी व्हावे - पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर परभणी / लोकशाहीमध्ये निवडणुका अत्यंत महत्वाची भूमिका बजावित असतात. निवडणूक ही लोकशाहीचा आत्मा आहे. ज्याप्रमाणे लोकशाहीसाठी निवडणूक महत्वाची, त्याप्रमाणे निवडणुकीकरीता मतदार यादी महत्वाची असते.भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र राज्यात सर्व विधानसभा मतदारसंघाच्या छायाचित्र मतदारयाद्यांचा विशेष संक्षिप्त पुन:रिक्षण कार्यक्रम जाहीर केला आहे. प्रारुप मतदार याद्या प्रसिद्ध केल्यानंतर ज्या मतदारांची नावे या यादीत समाविष्ट नाहीत अशा मतदारांना अथवा प्रारुप मतदार यादीमध्ये करण्यात आलेल्या नोंदीबाबत ज्‍या मतदारांना आक्षेप घ्यावयाचे असतील अशा मतदारांना किंवा त्यामध्ये दुरुस्ती / सुधारणा करावयाची असेल अशा मतदारांना विहित नमुन्यामध्ये अर्ज सादर करता येतील. त्‍यासाठी दिनांक ०१ सप्‍टेंबर २०१८ रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिध्‍द करण्‍यात आली आहे. या प्रारूप मतदार याद्या सर्व मतदान केंद्रांवर, मतदार नोंदणी अधिकारी , सहायक मतदार नोंदणी अधिकारी व जिल्‍हा निवडणुक अधिकारी यांचे कार्यालयात प्रसिध्‍द करण्‍यात आलेल्‍या आहेत. या मतदार यादीमध्‍ये ज्‍या मतदाराची नावे समाविष्‍ट नाहीत अशा मतदारांना नमुना -६ मध्‍ये अर्ज सादर करून त्‍यांची नावे मतदार यादीत समाविष्‍ट करता येतील. तसेच अनिवासी भारतीय नागरिकांना नमुना -6अ मध्‍ये अर्ज करुन मतदार यादीत नाव समाविष्‍ट करता येईल. मतदार यादीत समाविष्‍ट असलेल्‍या नोंदीबाबत आक्षेप असल्‍यास सदर नोंद वगळण्‍यासाठी नमुना -७ मध्‍ये अर्ज सादर करता येतील. तसेच मतदार यादीत असलेल्‍या नोंदीबाबत दुरूस्‍ती करावयाची असल्‍यास नमुना -८ मध्‍ये आणि एका भागातून दुस-या यादीभागात नोंद स्‍थलांतरीत करावयाची असल्‍यास विहीत नमुना -८अ मध्‍येअर्ज सादर करता येतील.सदर अर्ज मतदार नोदंणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी, सहा. मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसिलदार यांचे कार्यालयात त्‍याच प्रमाणे मतदान केंद्रस्‍तरीय अधिकारी तथा बिएलओ यांचेकडे मतदान केंद्रावर सादर करता येतील मतदारांना त्‍यांचे अर्ज दि. 01 सप्‍टेबर 2018 ते 31 ऑक्‍टोबर 2018 या कालावधी मध्‍ये सादर करता येतील. आपल्याला मतदानाचा हक्क भारतीय राज्यघटनेने दिला आहे. 18 वर्षावरील प्रत्येक भारतीय मतदान करू शकतो. मतदानाचा हा पवित्र हक्क बजावता यावा यासाठी आपले नाव मतदार यादीत असणे आवश्यक आहे. पात्र असलेल्या एकही मतदार मतदानापासून वंचित राहू नये यासाठी परभणी जिल्ह्यातील नागरिकांनी जास्तीत जास्त सहभाग नोंदवावा असे आवाहन पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांनी केले आहे दि.१ जानेवारी २०१९ रोजी ज्या भारतीय नागरिकाचे वय १८ वर्षापेक्षा कमी नाही म्हणजेच ज्यांची जन्मतारीख दि.१ जानेवारी २००१ वा त्यापूर्वीची आहे व जो त्‍या यादी भागातील सर्वसाधारण रहिवासी आहे, अशी व्यक्ती मतदार म्हणून नोंदणीसाठी पात्र राहील. मतदारांच्या सुलभतेसाठी www.nvsp.in या संकेतस्थाळावर ऑनलाईन नाव नोंदणीची तसेच यादीतील तपशिलात बदल करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी www.ceo.maharashtra.gov.in या संकेतस्थळास भेट द्यावी. उपरोक्त सर्व माहिती दि. १ सप्टेंबर २०१८ पासून संकेतस्थळावर उपलब्ध राहील.