विभागीय सक्षमीकरण संकल्प मेळावा अजित पवार यांची विशेष उपस्थिती औरंगाबाद- मराठवाडा विभाग राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्यावतीने बुधवार, दि.26 सप्टेंबर रोजी विभागीय राष्ट्रवादी युवकचा बूथ कमिटी सक्षमीकरण संकल्प मेळावा आयोजित करण्यात आला असून सदरील मेळाव्यास राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची विशेष उपस्थिती राहणार असल्याचे राष्ट्रवादी युवकचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते पाटील यांनी दिलेल्या प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे. औरंगाबाद येथील संत तुकाराम महाराज (सिडको नाट्यगृह) नाट्यगृहात सकाळी 11 वा. हा संकल्प मेळावा सुरू होईल. राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्यावतीने राज्यातील विविध विभागात बूथ कमिटी सक्षमीकरण संकल्प मेळावे आयोजित करण्यात आले आहे. पश्चिम महाराष्ट्र, विदर्भानंतर मराठवाड्याचा विभागीय संकल्प मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यासाठी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर, प्रकाश सोळंके, राजेश टोपे, राणाजगजितसिंह पाटील, आ.सतीश चव्हाण, आ.विक्रम काळे, आ.भाऊसाहेब पा.चिकटगावकर, आ.प्रदीप नाईक, आ.राहुल मोटे, आ.विजय भांबळे, आ.मधुसुदन केंद्रे, आ.बाबाजाणी दुर्राणी, मा.आ.शंकरआण्णा धोंडगे, मा.आ.अमरसिंह पंडित आदींची प्रमुख उपस्थिती राहणार असून मराठवाड्यातील राष्ट्रवादी पक्षाचे सर्व सेलच्या जिल्हाध्यक्षांसह पदाधिकारी देखील मोठ्या सं‘येने उपस्थित राहणार आहेत. अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसने सक्षमीकरण संकल्प मेळावा ही संकल्पना हाती घेतली असून राज्यभर विभागनिहाय हे मेळावे आयोजित केले जात आहेत. माजी मंत्री शशिकांत शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत 21 जुलै रोजी नाशिक येथे उत्तर महाराष्ट्राचा तर 23 जुलै रोजी अकोला येथे विदर्भाचा मेळावा घेण्यात आला. तर 22 जुलै रोजी पिंपरी चिंचवड येथे धनंजय मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत पश्चिम महाराष्ट्राचा विभागीय मेळावा घेण्यात आला. ‘वन बूथ फिप्टीन युथ’ ही संकल्पना हाती घेऊन माझा राज्याचा संपूर्ण दौरा पूर्ण झाला असून प्रत्येक बूथवर राष्ट्रवादी युवकचे 15 कार्यकर्ते या सक्षमीकरण संकल्प मेळाव्याच्या माध्यमातून जोडण्याचा आमचा मानस असल्याचे संग्राम कोते यांनी म्हटले आहे.तरी जास्तीत जास्त युवकांनी या सक्षमीकरण संकल्प मेळाव्यासाठी उपस्थित राहावे असे आवाहन संग्राम कोते पाटील, औरंगाबाद युवकचे जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब तरमळे, कार्याध्यक्ष रहीम पटेल, शहराध्यक्ष दत्ता भांगे, शहर कार्याध्यक्ष शेख कय्युम अहमद आदींनी केले आहे.