गणराजाच्या दर्शनाने झाली 'नशीबवान' सिनेमाच्या प्रमोशनला सुरुवात कोणत्याही शुभकार्याची सुरवात श्रीगणेशाला वंदन करून करावी म्हणजे कोणतेही विघ्न कार्यात येत नाहीत असे म्हणतात. नुकतेच आगामी 'नशीबवान' सिनेमाच्या टीमने देखील गणेश गल्लीतला 'मुंबईचा राजा' आणि 'लालबागचा राजा' अश्या दोन मानाच्या गणपतींचे दर्शन घेऊन आपल्या सिनेमाच्या प्रमोशनला सुरुवात केली आहे. 'नशीबवान'मध्ये मुख्य भूमिका बजावणारा भाऊ कदमदेखील यावेळी हजर होता. बाप्पाकडे 'नशीबवान' सिनेमाच्या यशाचं साकडं घालण्यासाठी सिनेमाची टीम पोहचली असताना राजकीय नेते निलेश राणे आणि गुणी कलाकार जयवंत वाडकर यांनीदेखील प्रमुख उपस्थिती लावली होती. उदय प्रकाश लिखित 'दिल्ली की दीवार' या कथेवर आधारित असलेल्या या सिनेमात भाऊ कदमच्या अभिनयाची एक वेगळीच छटा प्रेक्षकांना पाहता येणार आहे. या सिनेमात भाऊसोबत मिताली जगताप वराडकर आणि नेहा जोशी देखिल मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. लॅन्डमार्क फिल्म्सच्या विधि कासलीवाल यांची प्रस्तुती असलेल्या या सिनेमाचे दिग्दर्शन अमोल वसंत गोळे यांनी केले आहे. या सिनेमाच्या निर्मितीफळीत अमित नरेश पाटील, विनोद मनोहर गायकवाड आणि महेंद्र गंगाधर पाटील यांचे नाव असून, प्रशांत विजय मयेकर आणि अभिषेक अशोक रेणुसे यांनी सहनिर्मात्याची भूमिका बजावली आहे. लवकरच प्रदर्शित होत असलेल्या या ‘नशीबवान’ सिनेमातून भाऊ कदम प्रेक्षकवर्गाला पुन्हा एकदा आपल्या अभिनयाने भुरळ घालेल यात काही शंका नाही.