गुजराती वाहिन्यांचा एवढा पुळका काशासाठी? आ.सतीश चव्हाण यांचा राज्य सरकारला सवाल औरंगाबाद- राज्याच्या शिक्षण विभागाने मराठी शिक्षकांना गुजराती वाहिनीवरून प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र या प्रशिक्षण वर्गासाठी दूरदर्शनच्या मालकीच्या सह्याद्री मराठी वाहिनीला डावलून चक्क गुजराती भाषेतील वंदे गुजरात या वाहिनीची निवड केली आहे. राज्य सरकारला गुजराती वाहिन्यांचा एवढा पुळका कशासाठी? असा सवाल मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांनी उपस्थित केला आहे. मागील तीन चार वर्षांपासून राज्य सरकारचा शालेय शिक्षण विभाग कुठल्या ना कुठल्या कारणांनी सतत चर्चेत राहत आला आहे. काही दिवसांपूर्वीच आठवीच्या पुस्तकांमध्ये गुजराती भाषेमध्ये धडे छापून आल्याचे प्रकरण ताजे असतानाच आता पुन्हा एकदा राज्याच्या शिक्षण विभागाला गुजराती भाषेचा पुळका आला आहे. राज्यातील इयत्ता पहिली ते आठवीच्या अभ्यासक्रमात बदल करण्यात आला आहे. या बदलेल्या अभ्यासक्रमासंदर्भात वेगवेगळ्या विषयांच्या शिक्षकांना 24 ते 28 सप्टेंबर रोजी व्हर्चुअल माध्यमातून हे प्रशिक्षण वर्ग आयोजित करण्यात येणार आहे. मात्र या प्रशिक्षण वर्गासाठी राज्य सरकारने दूरदर्शनच्या मालकीच्या सह्याद्री मराठी वाहिनीला डावलून चक्क गुजराती भाषेतील वंदे गुजरात या वाहिनीची निवड केली आहे.राज्य सरकार हे गुजरातला धार्जीण असून अगोदरच राज्यातील विविध प्रकल्प गुजरातला पळवले जात आहेत. राज्यातील विविध प्रकल्पांचे कामे गुजराती कंपन्यांना दिल्या जात आहेत. राज्य सरकारच्या या निर्णयाच्या आम्ही जाहीर निषेध करत असल्याचे आ.सतीश चव्हाण यांनी म्हटले आहे.