रिक्षाला क्यू आर कोड स्टीकर्स लावून घेण्याचे आवाहन औरंगाबाद, – सर्व परवानाधारक रिक्षांसाठी राज्य परिवहन प्राधिकरणाच्या निर्णयानुसार क्युआर कोड स्टिकर्स बंधनकारक करण्यात आलेले आहेत. याबाबतची अंमलबजावणी दोन महिन्यांपासून करण्यात आलेली आहे. परंतु असे निदर्शनास आलेले आहे की, याबाबत रिक्षा मालक व चालकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत नाही. सर्व परवानाधारक रिक्षा मालक व चालकांनी क्युआर कोड स्टिकर्स प्राप्त करण्यासाठी परवाना धारकाची माहिती एकूण तीन वाहन चालकांची माहिती लायसन्सच्या वर्णनासह अर्जाव्दारे आरटीओ कार्यालयाकडे करून रूपये 50 इतके शुल्क भरून क्युआर कोड स्टिकर्स उपलब्ध करून घ्यावेत. नवीन नोंदणीसाठी व नियमीत पासिंगसाठी मौजे करोडी येथे जाणाऱ्या रिक्षा मालकांनी, चालकांनी सर्व अद्यावत माहितीसह वाहन पासिंगच्या दोन दिवस अगोदर क्युआर कोड स्टिकर्ससाठी अर्ज करावेत व वाहनाच्या पासिंग सोबतच क्युआर कोड स्टिकर्स उपलब्ध करून घ्यावेत. कार्यालयातर्फे नियमित तपासणीमध्ये विना क्युआर कोड स्टिकर्स रिक्षा आढळुन आल्यास याबाबत योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल. क्युआर कोड प्रदर्शित न केल्यास पहिल्या गुन्ह्याकरीता एक हजार रूपये दंड किंवा 5 दिवस परवाना निलंबन, दुसऱ्या गुन्ह्याकरीता तीन हजार रूपये दंड किंवा 10 दिवस परवाना निलंबन आणि तिसऱ्या गुन्ह्याकरीता पाच हजार रूपये दंड किंवा 15 दिवस परवाना निलंबन याप्रमाणे कार्यवाही करण्यात येईल याची नोंद घ्यावी, असे प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी प्रसिद्धीपत्रकान्वये कळविले आहे.