स्पर्धा परीक्षेच्या यशासाठी लोकराज्यचे वाचन आवश्यक– उपजिल्हाधिकारी अंजली धानोरकर औरंगाबाद, – स्पर्धा परीक्षेच्या यशासाठी वाचन आवश्यक असून शासनाच्या विविध योजनांची अद्ययावत माहिती देणारे लोकराज्य हे उपयुक्त अधिकृत संदर्भ साहित्य आहे. त्यादृष्टीने लोकराज्यचे वाचन आवश्यक असल्याचे प्रतिपादन उपजिल्हाधिकारी अंजली धानोरकर यांनी आज येथे केले.बजाजनगर येथे औरंगाबाद जिल्हा माहिती कार्यालय व गरुडझेप अकॅडमीच्या संयुक्त विद्यमाने आयोजित लोकराज्य वाचक मेळाव्यात श्रीमती धानोरकर बोलत होत्या. याप्रसंगी माहिती संचालक यशवंत भंडारे, जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत, अकॅडमीचे संचालक सुरेश सोनवणे, माहिती अधिकारी वंदना थोरात आदींची उपस्थिती होती.यावेळी श्रीमती धानोरकर म्हणाल्या की, राज्यशासनाच्या विविध योजनांची अधिकृत माहिती अद्ययावत आकडेवारीसह नाममात्र शुल्कात उपलब्ध करुन देणारे लोकराज्य हे विश्वासहार्य आणि उपयुक्त वाचन साहित्य आहे. स्पर्धा परीक्षेच्या तयारीमध्ये या पध्दतीची माहिती अभ्यासाचा एक अविभाज्य घटक आहे. आपल्या स्पर्धा परीक्षा अभ्यासाच्या तयारीच्या वेळेस आपण देखील लोकराज्य मासिक नियमितपणे वाचत असल्याचे सांगुन श्रीमती धानोरकर म्हणाल्या की, यशस्वी जीवन प्रवासासाठी विद्यार्थ्यांनी परीक्षेपुरता संकुचित विचार न करता ज्ञानार्थी बनुन व्यापक दृष्टीकोन आत्मसात केला पाहिजे. आपल्याला त्यातून ‍मिळणारे ज्ञान हे संपूर्ण आयुष्यात आपल्याला योग्यरित्या वापरता आले पाहिजे. परीक्षेच्या तसेच एकदंरीत जीवनातील यशासाठी सातत्य, आणि अडचणींवर मात करण्याची जिद्द बाळगली पाहिजे. प्रतिकुल परिस्थितीत खचुन न जाता मोठी स्वप्ने पाहण्याचे धैर्य आणि ते पूर्ण करण्याचे सामर्थ्य वाढविले पाहिजे, असेही धानोरकर यांनी यावेळी सांगितले.कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात माहिती संचालक यशवंत भंडारे यांनी लोकराज्य मासिकाच्या सुरूवातीच्या कृष्णधवल निर्मितीपासुन गेल्या सात-आठ वर्षात अमुलाग्र बदलांच्या विविध टप्प्याबद्दल विद्यार्थ्यांना माहिती दिली. माहिती जनसंपर्क महासंचालनालयाच्या प्रकाशनापैकी दुर्गम भागांपर्यंत पोहच असलेल्या लोकराज्य मासिकाच्या निर्मितीची प्रक्रिया प्रधान सचिव दर्जाच्या अधिकाऱ्याद्वारे पाहिली जाते. महिला विशेषांक, पर्यटन, पर्यावरण, वारी, यासह राज्याच्या सांस्कृतिक, शैक्षणिक, अल्पसंख्याक, इतर शासकीय ध्येय धोरणांच्या व्यापक माहितीचा स्त्रोत लोकराज्य मासिकातून दर महिन्याला वाचकांसाठी मात्र दहा रुपये शुल्कात उपलब्ध करुन दिला जातो. तसेच शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची अधिकृत माहिती देणारे लोकराज्य मासिक मात्र शंभर रुपये वार्षिक वर्गणीत वर्गणीदारांना घरपोच उपलब्ध करुन दिल्या जाते. तरी विद्यार्थ्यांना हे उपयुक्त संदर्भ साहित्य नियमित वाचावे असे आवाहन करुन श्री.भंडारे म्हणाले की, स्पर्धा परीक्षा किंवा आयुष्यात कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी संयम, सातत्य, आणि जिद्द असणे आवश्यक आहे. घोर मेहनतीपेक्षाही यशासाठी योग्य दिशेने नियोजनबध्द प्रयत्न गरजेचे असतात. हे लक्षात घेऊन विद्यार्थ्यांनी वेळेचे नियोजन, अभ्यासाचा प्राधान्यक्रम, काय वाचावे यासोबतच काय वाचू नये याचेही नियोजन करणे गरजेचे आहे. अनेकांमध्ये आपले वेगळेपण अधोरेखित करण्यासाठी आपली लिखाणाची स्वतंत्र शैली विकसित करण्याकडे प्राधान्याने लक्ष केंद्रीत केले पाहिजे असेही श्री.भंडारे यांनी सांगितले.यावेळी गरुडझेप अकॅडमीचे संचालक सुरेश सोनवणे यांनी विद्यार्थ्यांनी सातत्याने नवनवीन कौशल्य ज्ञान आत्मसात करण्यासाठी तयार असले पाहिजे. आपला स्वप्नांच्याप्रती कृतीशील ध्यास ठेवला पाहिजे असे यावेळी सांगितले. जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत यांनी आभार व्यक्त केले. जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने लावण्यात आलेल्या लोकराज्य स्टॉलला विद्यार्थ्यांनी मोठा प्रतिसाद दिला.