शासनाच्या योजनांचा प्रचार, प्रसारासाठी स्वयंसेवी संस्थांनी पुढाकार घ्यावा- डॉ. भागवत कराड औरंगाबाद, ) – केंद्र व राज्य शासनाच्या विविध कल्याणकारी योजना आहेत. त्या तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी, त्या योजनांचा लाभ प्रत्यक्ष लाभार्थ्यांना मिळावा यासाठी मराठवाड्यातील विविध स्वयंसेवी संस्थांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन मराठवाडा विकास मंडळाचे अध्यक्ष डॉ. भागवत कराड यांनी केले. मराठवाडा विकास मंडळाच्या सभागृहात स्वयंसेवी संस्थेच्या दि.19 रोजीच्या बैठकीत मंडळाचे अध्यक्ष डॉ. भागवत कराड बोलत होते. यावेळी मंडळाचे सदस्य सचिव डी.एम. मुगळीकर,संजय खंबायते, डॉ. संजय गव्हाणे, काकासाहेब तायडे, वसुंधरा प्रकल्पाचे नरहरी शिवपुरे, उत्कर्ष संस्थेचे ज्ञानेश्वर हनवते, प्रदीप पांगरीकर, बालासाहेब हावळे, वैजनाथ थोरवे, कल्पना निकम आदींसह मराठवाड्यातील सेवाभावी संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.डॉ. कराड म्हणाले, लोकसहभाग, स्वयंसेवी संस्था आणि मराठवाडा विकास मंडळाच्या माध्यमातून मराठवाड्याचा विकास करावयाचा आहे. मराठवाड्याच्या पाणलोट क्षेत्रविकासासाठी सर्व संस्थांनी पुढाकार घेणे आवश्यक आहे. लवकरच जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या समवेत मराठवाडा विकास मंडळाची बैठक बोलविण्यात येईल, त्यामध्ये सर्व स्वयंसेवी संस्थांनी उपस्थित राहावे. स्वयंसेवी संस्थांनी केलेल्या सूचनांचा विचार करून मंडळामार्फत सर्वोतोपरी सहकार्य करण्यात येईल, असेही डॉ. कराड म्हणाले. बैठकीच्या सुरूवातीला शिवपुरे यांनी पाणलोट क्षेत्रविकासाबाबत माहिती दिली. तसेच स्वयंसेवी संस्थेच्या वतीने निवेदनही डॉ. कराड यांना यावेळी देण्यात आले.मंडळाचे सदस्य सचिव डी.एम. मुगळीकर यांनीही स्वयंसेवी संस्थांनी केलेल्या सामाजिक कार्याचे छायाचित्र मराठवाडा विकास मंडळाच्या संकेतस्थळावर अपलोड करावे, यासाठी उपलब्ध करून द्यावे. तसेच सामाजिक बांधिलकीतून शासनाच्या विविध योजना जनसामान्यांपर्यंत पोहोचाव्यात, यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहनही केले.