महाविद्यालये, उद्योगक्षेत्रात समन्वयाची आवश्यकता - सहसंचालक डॉ सतीश देशपांडे यांचे प्रतिपादन - 'संशोधन पध्दती'वर कोर्सचे उदघाटन औरंगाबाद, दि.२४ : जागतिकीकरणानंतर नौकरी व व्यवसाय या क्षेत्रात झपाट्याने बदल होत असून कुशल मनुष्यबळाची वानवा आहे. अशावेळी महाविद्यालये, विद्यापीठांनी उद्योग क्षेत्रासोबत समन्वय ठेऊन अभ्यासक्रम बनवावेत, प्राध्यापकांनी स्वतःला अपडेट ठेवावे, असे प्रतिपादन उच्चशिक्षण सहसंचालक डॉ सतीश देशपांडे यांनी केले. डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील मनुष्यबळ विकास केंद्रातर्फे विज्ञान शाखेतील प्राध्यापकांसाठी 'संशोधन पध्दती'वरील शॉर्ट टर्म कोर्सला सोमवारी (दि.२४) सुरुवात झाली. यावेळी प्रख्यात मॅनेजमेंट तज्ञ डॉ अरविंद बाबु (हैद्राबाद), कोर्स समन्वयक तथा सहायक संचालक डॉ.मोहम्मद अब्दुल राफे यांची व्यासपीठावर उपस्थिती होती. डॉ. सतीश देशपांडे यांनी कोर्सचे उदघाटन केले. यावेळी ते म्हणाले,गेल्या काही वर्षात ग्रामीण भागात , तालुका स्तरावर मोठ्या प्रमाणावर महाविद्यालये सुरु झाली. उच्च शिक्षणाची गंगोत्री गावोगावी पोहोचली मात्र दर्जाचा प्रश्न निर्माण झाला. आपण प्रयोगशाळा व तेथिल यंत्र सामुग्री याचा वापर व्यव्स्थितपणे केला पाहिजे, असेही डॉ देशपांडे म्हणाले. तर उच्च शिक्षण व उद्योग यांच्यात संवाद निर्माण होऊन दर्जेदार प्रयोगशाळा व व्यवसायाभिमुख प्रशिक्षण देणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन डॉ अरविंद बाबु यांनी केले. एका आठवडयाच्या या कोर्समध्ये ४० प्राध्यापक सहभागी झाले असून येत्या २१ जूनपर्यंत कोर्स चालणार आहे, अशी माहिती डॉ.मो.अब्दुल राफे यांनी दिली. दरम्यान, वर्षभरात या केंद्रात प्राध्यापक, कर्मचारी, प्राचार्यांसाठी २५ कोर्स आयोजित करण्यात आले आहेत, अशी माहिती संचालक डॉ.एन एन बंदेला यांनी दिली.