ड्रिप कॅपिटलची भांडवलीकरणासाठी खास मदत नाशिक, 24 जून २०१९: ड्रिप कॅपिटल या व्यापारी वित्तसेवा कंपनीतर्फे 'निर्यात फॅक्टरिंगबाबत संवादात्मक सत्र – एसएमई निर्यातदारांसाठी असुरक्षित वित्तव्यवहारांना सोपा पर्याय' या विषयावर नाशिक येथे खास परिषदेचे आयोजन करण्यात आले. फेडरेशन ऑफ इंडियन एक्स्पोर्ट ऑर्गनायझेशन्स (एफआयईओ) या संस्थेशी भागीदारी करून हा उपक्रम आयोजित करण्यात आला. ड्रिप कॅपिटलच्या पश्चिम विभागाचे प्रादेशिक विक्री प्रमुख श्री. इशान दधीच यांनी सादर केलेल्या या परिषदेत एफआयईओ (डब्ल्यूआर)चे उपसंचालक श्री. धनंजय शर्मा आणि एफआयईओ (डब्ल्यूआर)चे व्यवस्थापकीय कार्यकारी अक्षय शहा उपस्थित होते. या कार्यक्रमाला नाशिकमधील अनेक लघु व मध्यम व्यावसायिक निर्यातदारांनी हजेरी लावली. भारताच्या एकूण निर्यातीच्या प्रमाणात ४५ टक्के वाटा एसएमईंचा असून यापैकी बहुतांश व्यावसायिकांना चालू भांडवल व्यवस्थेबद्दल चिंता सतावत असते. कोलॅटरल कर्जे, प्रक्रियांचा दीर्घकाळ, कागदी व्यवहारांचा ताण आणि अशा अन्य अडचणींमुळे चालू भांडवल एसएमईंसाठी अनिश्चित किंबहुना अशक्य होऊन बसते. फॅक्टरिंग कंपन्या किंवा एनबीएफसींतर्फे पर्यायी वित्तीय सोल्यूशन्स दिली जात असली तरीही, अनेक निर्यातदारांना याबाबत माहिती नसते, ती माहिती त्यांना करून देण्याची गरज आहे. इन्व्हॉईस फॅक्टरिंग ही यापैकी एक उत्तम पर्यायी पद्धत आहे. सर्वांत प्राथमिक पायरी म्हणजे, फॅक्टर किंवा घटक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तृतीय पक्षाला आपल्या वित्तव्यवहारांचे इन्व्हॉईस भांडवल उभारणीसाठी विकणे, म्हणजेच इन्व्हॉईस फॅक्टरिंग असते. आपल्या व्यवहारांच्या पार्श्वभूमीनुसार आणि अन्य निकषांनुसार, फॅक्टर म्हणजेच घटक विक्रेत्याला (निर्यातदाराला) एक क्रेडिट लाईन देतो. या क्रेडिट लाईनचा उपयोग अन्य आयातदारांना वित्तव्यवहार करताना होऊ शकतो. बऱ्याचदा, फॅक्टरकडून (कोलॅटरलच्या आवश्यकतेशिवाय) विक्रेत्याला त्यांच्या इन्व्हॉईसच्या ८० टक्के मूल्य मिळू शकते. खरेदीदाराने मूल्य फॅक्टरकडे हस्तांतरित केल्यानंतर, उर्वरित २० टक्के मूल्य फॅक्टरची फी किंवा व्याज म्हणून आकारली जाते. गेल्या तीन ते चार वर्षांत नाशिकमध्ये निर्यातीच्या प्रमाणात मोठी वाढ झाल्याचे दिसून आले आहे. आजच्‍या घडीला, दरवर्षी येथील निर्यातदार द्राक्षे, कांदे, डाळिंब आणि औद्योगिक मालाची निर्यात करतात. या व्यतिरिक्त, कापडोद्योगासाठीही नाशिक शहर प्रसिद्ध आहे. नाशिकच्या बाह्य भागांत असलेले येवला हे ठिकाण तर वस्त्रोद्योगासाठी प्रसिद्धच आहे. पेशवाईच्या १९व्या शतकात या शहराला खास महत्व प्राप्त झाले. आज येवल्यात २,२००हून अधिक कापडगिरण्या आणि हातमाग केंद्रे आहेत. जवळ-जवळ प्रत्येक घरात हातमाग यंत्र असून साड्यांचे नक्षीदार डिझाईन हे या भागाचे वैशिष्ट्य आहे. येथील पैठणी साड्यांच्या निर्यातीसाठी अंबड येथील एमआयडीसी भागात केंद्र सरकारने फ्रेट स्टेशन स्थापन केले आहे.