लोकराज्य विशेषांकाचे जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांच्या हस्ते प्रकाशन जालना -: माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत प्रसिद्ध केल्या जाणाऱ्या लोकराज्यच्या ‘सामर्थ्य शिक्षणाचे, समृद्ध महाराष्ट्राचे’ विशेषांकाचे जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. यावेळी जिल्हा पुरवठा अधिकारी राजू नंदकर, महिती सहायक अमोल महाजन राजेंद्र वाणी उपस्थित होते. अंकामध्ये डॉ. विनय सहस्त्रबुद्धे, शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे, डॉ. भालबा विभूते, डॉ. गो. मा पवार, धनराज माने आदी मान्यवरांनी राजर्षी शाहू महाराज व शैक्षणिक क्रांती या विषयाच्या अनुषंगाने विचार मांडले आहेत. तसेच उद्योजकता व कौशल्य विकास विभागामार्फत चालविल्या जाणाऱ्या कर्ज व्याज परतावा योजना, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या विविध यशकथा आहे. असा संग्राह्य वाचनीय अंक प्रत्येकाने वाचावा, तसेच लोकराज्य मासिकाचे वर्गणीदार व्हावे असे आवाहन जिल्हाधिकारी श्री बिनवडे यांनी यावेळी केले.