सांस्कृतिक कार्यक्रमाने होणार व्याख्यानमालेस प्रारंभ-अरुण मगरे जालनेकर रसिकांना नामवंतांचे विचार श्रवण करण्याची संधी-सुहास साळवे जालना - गेल्या बेचाळीस वर्षापासून अविरतपणे सुरु असलेल्या जालन्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर व्याख्यान मालेस येत्या आठ एप्रिलपासून सुरुवात होत असून प्रारंभीच व्याख्यानाचा कार्यक्रम घेण्याऐवजी यावर्षी प्रथमच सांस्कृतिक कार्यक्रमाने व्याख्यानमालेस सुरुवात होणार असल्याची माहिती डॉ. बाबासाहेब आंबेडकर व्याख्यानमालेचे अध्यक्ष श्री. अरुण मगरे यांनी येथे बोलतांना दिली.दरम्यान, यावर्षी देखील व्याख्यानमाला समितीच्यावतीने सुप्रसिध्द अशा नामवंतांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले असून व्याख्यानमालेतील नामवंतांचे विचार श्रवण करण्याची आलेली संधी जालनेकर रसिकांनी चुकू नये, असे आवाहन व्याख्यानमालेचे सचिव सुहास साळवे यांनी केले आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व्याख्यानमालेविषयी विस्तृत माहिती देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषद श्री. अरुण मगरे बोलत होते. यावेळी व्याख्यान मालेचे सचिव सुहास साळवे तसेच विजयकुमार पंडीत, डॉ. जे. एस. किर्तीशाही, सुधाकर रत्नपारखे, एन. डी. गायकवाड, सुनिल साळवे आदींची उपस्थिती होती. पुढे बोलतांना श्री. मगरे म्हणाले की, बेचाळीस वर्षापासून म्हणजे 1978 पासून जालन्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर व्याख्यानमाला अविरतपणे सुरु आहे. प्रारंभीच्या व्याख्यानमालेचे अध्यक्ष एल. एस. इंगळे आणि सचिव दिगंबर गायकवाड यांच्यापासून आतापर्यंत व्याख्यानमालेच्या निमित्ताने ख्यातनाम व्याख्यात्यासंह सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यक्रम देखील व्याख्यानमाला समितीने घेतलेले आहेत. यावर्षी देखील अत्यंत चांगले विचार जालनेकरांना ऐकायला मिळावेत म्हणून विचारवंतांना आमंत्रित करण्यात आलेले आहे. व्याख्यानमालेचे अध्यक्षपद आपल्याकडे आले हे माझे भाग्यच समजतो. कारण भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्ताने का होईना समाजसेवेची एक चांगली संधी यानिमित्ताने उपलब्ध होत असते आणि ती जबाबदारी व्याख्यानमालेच्या पदाधिकार्‍यांनी माझ्यावर सोपवली आहे. त्यामुळे आपण देखील जबाबदारीनेच हे कार्य सर्वांच्या सहकार्याने पार पाडण्याचा प्रयत्न करत आहोत. व्याख्यानमालेचे स्वागताध्यक्ष माजी आमदार श्री. कैलास गोरंट्याल, सचिव सुहास साळवे, कोषाध्यक्ष वैभव उगले, उपाध्यक्षा नंदाताई पवार, एम. पी. पवार, कैलास रत्नपारखे, विलास रत्नपारखे, सिमोन सुतार, दिनकर घेवंदे आणि सर्व पदाधिकारी यांच्या सहभागातून आणि सहकार्यातून हे कार्य निश्चितच फलदायी ठरेल यात कसलीही शंका नाही. आपण दरवर्षीच व्याख्यानमालेचा शुभारंभ हा व्याख्यात्याच्या व्याख्यानाने करत आलेलो आहोत. मात्र यावर्षी सुरुवातीला व्याख्यान आयोजित न करता मुद्याहून शाहिरी भिमदर्शन हा अप्पातात्या उगले आणि सहकार्‍यांचा कार्यक्रम सोमवार दि. 8 एप्रिल रोजी ठेवण्यात आला असून व्याख्यान मालेचे उद्घाटन राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर यांच्या हस्ते होणार आहे. तर मंगळवार दि. 9 एप्रिल रोजी संभाजी ब्रिगेडचे अमोल मिटकरी हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अपेक्षीत लोकशाही व आजची वास्तविकता या विषयावर दुसरे पुष्प गुंफणार आहेत. बुधवार दि. 10 एप्रिल रोजी मुंबई येथील श्री. रमेश शिंदे हे आंबेडकर कालीन चळवळ आणि आजच्या चळवळीतील वास्तव या विषयावर तिसरे पुष्प गुंफणार आहेत. गुरुवार दि. 11 एप्रिल रोजी आयुष्यमती रमा अहिरे (मुंबई) ह्या जागतिकीकरणात महिलांसमोरील आव्हाने या विषयावर चौथे पुष्प गुंफणार आहेत. शुक्रवार दि. 12 एप्रिल रोजी कोल्हापूर येथील डॉ. संभाजी बिरांजे हे भारतीय समाज व्यवस्थेला विद्रोहाचे तत्वज्ञान देणारे डॉ. अंांबेडकर याविषयावर पाचवे पुष्प गुंफणार असून व्याख्यानमालेचा समारोप शनिवार दि. 13 एप्रिल रोजी मा. आ. जितेंद्र आव्हाड (मुंबई) हे देशातील सद्यकालीन परिस्थिती आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर या व्याख्यानाने होणार आहे. दि. 8 ते 13 एप्रिल 2019 पयर्ंंत शहरातील मा. कृृष्णराव फुलंब्रीकर नाट्यगृहात दररोज सायंकाळी 7 वाजता आयोजित या व्याख्यानमालेस शहर व पंचक्रोशितील नागरीक व महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आंबेडकरी विचारांचे श्रवण करावे, असे आवाहन व्याख्यानमालेचे अध्यक्ष अरुण मगरे, सचिव सुहास साळवे, कोेषाध्यक्ष वैभव उगले, उपाध्यक्ष नंदाताई पवार, एम. पी. पवार, कैलास रत्नपारखे, विलास रत्नपारखे, सिमोन सुतार, दिनकर घेवंदे यांच्यासह कार्यकारिणीतील पदाधिकार्‍यांनी केले आहे.