मयुर्वी रविकिरण संगेकर हिला राष्ट्रीय बालश्री पुरस्कार जाहीर;आमदार प्रशांत बंब यांनी केले अभिनंदन लासूर स्टेशन (ता.गंगापूर) :- येथील मयुर्वी रविकिरण संगेकर हिला यंदाचा राष्ट्रीय बालश्री पुरस्कार जाहीर झाला असून गंगापूरचे आमदार प्रशांत बंब यांनी कौतुक करत अभिनंदन केले आहे. भारताच्या मानव संसाधन विकास मंत्रालय अंतर्गत असणाऱ्या "राष्ट्रीय बाल भवन" द्वारे विविध विषयातील निवडक सर्वोत्कृष्ट विद्यार्थ्यांना राष्ट्रपतींच्या हस्ते ''बालश्री '' पुरस्कार दिले जातात. औरंगाबाद येथील गरवारे बाल भवन हे दिल्लीच्या राष्ट्रीय बाल भवनशी संलग्न आहे. गरवारे बाल भवनातून मयुर्वीने क्रीएटीव्ह व्हिज्युअल आर्ट या विषयात भाग घेतला होता. सर्वप्रथम मयुर्वीची जिल्हास्तरीय पातळीवर निवड झाली नंतर तिने राज्यस्तरीय पातळीवर प्रथम क्रमांक मिळविला. गेल्यावर्षी एप्रिलमध्ये दिल्ली येथे झालेल्या राष्ट्रीय पातळीवर निवड झालेल्या स्पर्धेतही मयुर्वीने यश मिळवले. या राष्ट्रीय पुरस्काराचा वितरण सोहळा लवकरच दिल्ली येथे माननीय राष्ट्रपतींच्या हस्ते आयोजित केला जाईल.गरवारे बाल भवनचे संचालक सुनील सुतावणे, मिथिल चव्हाण, शिल्पा मॅडम यांनी परिश्रम घेतले. मयुर्वी हि लासूर स्टेशन येथील डॉ.विकास संगेकर यांची नात, अॅडराईजर मिडीयाजचे रवि संगेकर, माया संगेकर यांची कन्या आहे. महाराष्ट्र पब्लिक स्कूलची विद्यार्थिनी असून मेजर घुगे, श्रीमती धोंड व शिक्षक तसेच गुरुवर्य नृत्यभूषण विक्रांत वायकोस यांच्याकडे ती भारतनाट्यमचे शिक्षण घेते. मयुर्वीने दहावीत असताना अष्टपैलू हा पुरस्कार पटकावलेला आहे.लहानपणापासूनच मयुर्वी विविध कला प्रकारात पारंगत आहे. मयुर्वी संगेकरला "राष्ट्रीय बालश्री पुरस्कार" जाहीर झाल्याचे समजताच गंगापूर-खुलताबाद चे आमदार प्रशांत बंब यांनी आपल्या कार्यालयात मयुर्वीचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला भरभरून कौतुक केले आणि भविष्यातील यशस्वी वाटचालीसाठी आशीर्वाद दिले.यावेळी सुरेश मुनोत, रवी चव्हाण आदी उपस्थित होते.मयूर्वीचे आप्त, नातेवाईक, मित्रमंडळ, ग्रामस्थ तसेच सर्व स्तरातून कौतुक होत आहे.