ममतेश्‍वर भक्त महिला मंडळाचा उपक्रम : संगीतमय श्रीमद् भावगत कथा ज्ञानाची गंगा म्हणजे श्रीमद् भागवत कथा-हभप रुख्मिणीताई हावरे जालना :- मानवामध्ये अनेक प्रकारचे गुण अवतरलेले आहेत. सात्विक, राजसी आणि तामसी वृत्तीचे लोक देखील या भू तलावावर आहेत. सात्विक म्हणजेच चांगले गुण असणारे कमी असले तरी राजसी आणि तामसी स्वभावाच्या लोकांची कमी नाही. तथापि, सुखकर जीवन जगायचे असेल तर श्रीमद् भागवत कथेचे श्रवण केले पाहिजे. हा ग्रंथ म्हणजे प्रत्यक्षात ज्ञानाची गंगा आहे, असा हितोपदेश प. पू. हभप रुख्मिणीताई हावरे यांनी येथे बोलतांना केला. मंमादेवी नगरातील ममतेश्‍वर महादेव मंदिर परिसरात ममतेश्‍वर भक्त महिला मंडळाच्यावतीने संगीतमय श्रीमद् भागवत कथेचे आयोजन करण्यात आले आहे.त्याप्रसंगी भागवताचार्य प.पू. रुख्मिणीताई हावरे बोलत होत्या. आजच्या कथेचे निरुपन करताना राजा परिक्षिताचे जीवन चरित्र आणि परम् भाग्यविधाते श्रीकृष्णांच्या लिलांचा उल्लेख करुन भागवताचार्य प.पू. रुख्मिणीताई हावरे म्हणाल्या की, गुण आणि दोष हे मनुष्यातच आहेत. त्यापैकी चांगला गुण अवगत करण्यासाठी कठीण यातनांना सामोरे जावे लागते. मात्र वाईट गुणांसाठी कोणतेही कष्ट लागत नाही. तथापि, जे विनासायस मिळते ते फार काळ टिकत नाही. त्यात कोणतेही सुख- समाधान देखील नाही. म्हणून अवगुणांपेक्षा चांगल्या गुणांसाठी यातना भोगाव्या लागल्या तरी त्या भोगायला हरकत नाही. कारण अंतीम सुख हे सत्य वचनातच आहे. श्रीकृष्णांनी अनेक प्रकारच्या लिला केल्या, खोड्या केल्या परंतू त्या लिलांमध्ये आणि खोड्यांमध्येही सात्विकपणाचा भाव होता. आज वरकरणी चांगली वाटणारी माणसे आतूनही निर्मळ असतीलच असे नाही म्हणूनच श्रीकृष्णांना अवतार घेऊन कंस मामा सारख्या दुष्ट प्रवृत्तीचा नाश करावा लागला, असेही शेवटी त्यांनी सांगितले. यावेळी मंमादेवीनगर, कांचननगर, नुतन वसाहत आणि परिसरातील भाविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. श्रीमद् भागवत कथा ज्ञान यज्ञ सोहळा यशस्वी करण्यासाठी ममतेश्‍वर भक्त महिला मंडळाच्या पदाधिकारी, सदस्य परिश्रम घेत आहेत.