‘मुद्रा’ योजनेतील तक्रार निवारणासाठी समुपदेशन केंद्र उभारणार -जिल्हाधिकारी उदय चौधरी औरंगाबाद – नव उद्योजकांना व्यवसाय उभारणीसाठी कर्ज मिळावे या उद्देशाने केंद्र सरकारने प्रधानमंत्री मुद्रा बँक योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत अर्जदारांना काही तक्रारी असल्यास अशा तक्रारींचे निवारण करण्यासाठी जिल्हा कौशल्य विकास विभागांतर्गत समुपदेशन केंद्र उभारण्यात येणार आहे. औरंगाबाद जिल्हा हा असे समुपदेशन केंद्र सुरू करणारा पहिलाच जिल्हा ठरणार असून या केंद्रामध्ये तक्रारींचा नियमित आढावा घेऊन त्या सोडविण्यासाठी पाठपुरावा केला जाणार असल्याचे जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी सांगितले. मुद्रा बँक योजना समन्वय समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित जिल्हास्तरीय समितीच्या बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली, त्यावेळी ते बोलत होते. पुढे बोलतांना जिल्हाधिकारी म्हणाले की, या योजनेचा लाभ घेताना अर्जदाराला कर्ज मिळण्यास काही अडचण निर्माण झाल्यास अशासकीय सदस्यांनी त्यांना मार्गदर्शन करणे गरजेचे आहे. यासाठी लवकरच अशासकीय सदस्यांसाठी विशेष प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात येईल. मुद्रा अंतर्गत प्राप्त तक्रारींचे निवारण करण्यासाठी जिल्हा कौशल्य विकास विभागामध्ये समुपदेशन केंद्र उभारण्यात येणार आहे. या केंद्रामध्ये बॅकींग क्षेत्रातील निवृत्त अधिकारी, त्याला सहाय्य करण्यासाठी सहायक आणि सामाजिक क्षेत्रात काम करण्याऱ्या संस्थांचे स्वयंसेवी यांचा समावेश असेल. हे सर्व नियमित कर्ज प्रकरणांचा, तक्रारींचा आढावा घेऊन त्या सोडविण्यासाठी पाठपुरावा करतील. या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना अधिकाधिक लाभ मिळण्यासंदर्भात महिन्याच्या तिसऱ्या मंगळवारी आढावा बैठक घेणार असल्याचेही जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी सांगितले बैठकीच्या सुरूवातीला समितीचे सदस्य तथा जिल्हा नियोजन अधिकारी विजय पवार यांनी आज पर्यंत या योजनेअंतर्गत झालेल्या उद्दिष्ट्यपुर्तीचा आढावा समितीसमोर मांडला. अशासकीय सदस्यांनी मांडलेल्या तक्रारींना उत्तर देताना जिल्हा अग्रणी बॅकेचे व्यवस्थापक श्री. कुठवळ म्हणाले की, ग्रामीण भागातील तरुणांना कर्ज मिळविण्यासाठी येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी यापुढे प्रत्येक बुधवार हा मुद्रा योजनेसंदर्भातील अर्जदारांच्या समस्या सोडविण्यासाठी राखीव ठेवण्यात येईल असे त्यांनी सांगितले. यावेळी मुद्रा योजनेच्या राज्यस्तरीय समितीचे अशासकीय सदस्य बसवराज मंगरुळे, चंद्रकांत हिवराळे, जिल्हा स्तरीय समितीचे अशासकीय सदस्य सुनिल शिंदे, राहुल चौधरी, कमलेश कटारिया, शंतनू उरेकर, भाऊसाहेब पाले, राजेश मेहता, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक श्री. कुठवळ, जिल्हा उघोग अधिकारी, औघोगिक प्रशिक्षण संस्था, जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उदयोजकता विभाग आदी विभागाचे प्रतिनिधी उपस्थित होते.