पंतप्रधानांनी मराठवाडयाच्या जलद विकासासाठी विशेष योजना आखाव्या मजविपचे पंतप्रधानांकडे पत्रादवारे साकडे औरंगाबाद : प्रतिनिधी-भारतातील १०४ अत्यंत अविकसीत जिल्हयांपैकी ७ जिल्हे एकटया मराठवाडयात आहेत हे लक्षात घेवून मराठवाडयाच्या जलद विकासासाठी पंतप्रधानांनी स्वतः लक्ष घालावे आणि केंद्रीय योजना राबवाव्यात असे साकडे मराठवाडा जनता विकास परिषदेचे अध्यक्ष अ‍ॅड.प्रदीप देशमुख यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना घातले आहे. मराठवाडा मुक्ती दिन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्म दिन एकाच दिवशी आहे. याचे औचित्य साधत अ‍ॅड.देशमुख यांनी नरेंद्र मोदी यांना शुभेच्छा देणारे पत्र पाठविले असून त्यात हैद्राबाद संस्थानातून मुक्त झाल्यानंतर महाराष्ट्रात बिनशर्त विलीन झालेल्या मराठवाडयाची गेल्या ७० वर्षांत उपेक्षाच चालू आहे याकडे लक्ष वेधले आहे. भारतीय राज्य घटनेच्या ३७१(२) कलमानूसार वैधानिक विकास मंडळांची स्थापना होवून देखील राज्य सरकारने वेळोवेळी मराठवाडयाला मिळणारा निधी अन्यत्र वळविल्यामुळे तसेच पश्चिम महाराष्ट्रावर विशेष लक्ष केंद्रीत केल्यामुळे मराठवाडयावर झालेला अन्याय भाजप सरकार आल्यानंतर दुर होईल ही आपेक्षा होती मात्र, ती अजुनही स्वप्नच ठरत आहे असेही पत्रात नमूद करण्यात आले आहे. विकासाची जबाबदारी केवळ राज्याची नसून केंद्र सरकारची देखील तितकीच जबाबदारी आहे हे लक्षात घेवून केंद्र सरकारने दमण गंगा पिंजाळचे किमान ८० टीएमसी पाणी गोदावरी खो-यात वळवून मराठवाडयाला उपलब्ध करुन देत दुष्काळापासून मराठवाडयाची मुक्तता करावी तसेच केंद्र सरकारच्या महत्त्वपूर्ण संस्था आणि योजना या विभागात मोठया प्रमाणावर राबवाव्यात अशी मागणीही करण्यात आली आहे. महाराष्ट्रात रेल्वेसाठी १ लाख ३६ हजार कोटींची गुंतवणूक करण्यात येत आहे. मात्र, त्यातील मराठवाडयासाठी नगन्य निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. २०१२ ते २०१६ च्या दरम्यान मरावाडयात दुष्काळी परिस्थिती होती व याकाळात पंतप्रधानांनी या विभागाला भेट द्यावी यासाठी आपण विनंती केली होती. ती फलदू्रप झाली नाही. यापुढे पंतप्रधानांनी मराठवाडयाकडे विशेष लक्ष द्यावी अशी मागणी पंतप्रधानांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत मराठवाडा जनता विकास परिषदेच्यावतीने करण्यात आली आहे.