बदनापूर/तालुक्याचे कुलदैवत असलेल्या सोमठाणा येथील रेणुका देवी मंदिरात नवरात्रीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले असून आज घटस्थापना होणार असून सोमठाणा येथील गडावर यानिमित्त हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आलेले आहे. तसेच या गडावर तालुक्यातून हजारो भावीक अबालवृध्द नऊ दिवस रात्रंदिवस येथेच राहून रेणुका देवीची सेवा करतात. या यात्रेसाठी गडावर संस्थानच्या वतीने मोठया प्रमाणात सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या असून येथे मुलांना खेळण्यासाठी रहाटपाळणे, मौत का कुंवा तसेच खानपानाचे स्टॉल थाटलेले दिसत आहे. जालना, संभाजीनगर जिल्हयातील अराध्यदैवत असलेले सोमठाणा येथील रेणुका देवी गड येथे सालाबादाप्रमाणे यंदा आज 10 ऑक्टोबर पासून नवरात्रोत्सवास सुरुवात होणार आहे. आज दुपारी 1 वाजता संस्थानचे अध्यक्ष राजेंद्र जैस्वाल यांच्या हस्ते घटस्थापना करण्यात येऊन गडावरील विविध धर्मिक कार्यक्रमाला उत्साहात सुरुवात होणार आहे. यंदा रेणुका देवी व महादेव मंदिर संस्थानचे अध्यक्ष राजेंद्रकुमार जैसवाल यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम आयोजित करण्यात आले असून सकाळी 4 ते 6 काकडा भजन, 8 ते 9 देवीची आरती, 9 ते 10 ज्ञानेश्वरी प्रवचण, 11 ते 12 गाथा भजन, दुपारी 1 ते 2 गोंधळ, 3 ते 4 रामायण, 4 ते 5 ज्ञानेश्वरी प्रवचण, 7 ते 8 देवीची आरती, 9 ते 11 कीर्तन व रात्री 11 ते 12 जागर होणार आहे. यंदा बुधवार, दि. 10 ऑक्टोबर रोजी हभप कडूबा महाराज दरकवाडीकर यांचे प्रवचण तर हभ्प केदार महाराज शास्त्री यांचे कीर्तन होणार आहे, 11 ऑक्टोबर रोजी हभप नारायण महाराज लहाने यांचे प्रवचण तर हभप ज्ञानेश्वर महाराज जाधव आंळदीकर यांचे कीर्तन, 12 ऑक्टोबर रोजी हभप रामचंद्र महाराज सिनगारे कंडारी यांचे प्रवचण, तर हभप कल्याणजी महाराज भुजंग यांचे कीर्तन, 13 ऑक्टोबर रोजी हभप रवींद्र महाराज मदने यांचे प्रवचण, हभप भागवत महाराज पाटील यांचे कीर्तन, 14 ऑक्टोबर रोजी हभप बळीराम गिते (पोलिस निरीक्षक) यांचे प्रवचण तर हभप जागृती जहागिरदार यांचे कीर्तन होणार आहे. 15 ऑक्टोबर रोजी हभप अण्णासाहेब गिते यांचे प्रवचण तर हभप अर्जुन महाराज महाकाळा यांचे कीर्तन होईल, 16 ऑक्टोबर रोजी सुरेश महाराज काळेगावंकर यांचे प्रवचण तर हभप अनिरुध्द महाराज क्षीरसागर यांचे कीर्तन होणार आहे. 17 ऑक्टोबर रोजी हभप शिवाजी महाराज शिंदे यांचे प्रवचण तर सायंकाळी हभप अशोक महाराज पांचाळ, आळंदीकर यांचे कीर्तन होणार आहे. गुरुवार 18 ऑक्टोबर 2018 रोजी सकाळी 9 ते 11 हभप कडूबा महाराज दरकवाडीकर यांचे काल्याचे कीर्तन होऊन महाप्रसादाने या सप्ताहाची सांगता होईल. यंदा संस्थानचे अध्यक्ष राजेंद्र जैसवाल, उपाध्यक्ष बाबूराव कोल्हे, सचिव शामकुमार जैसवाल, जयकिशन गिल्डा, सुरेश तापडीया, रामकिसन मेंढरे, अनिल कोलते यांच्या मार्गदर्शनाखाली यात्रेचे नियोजन करण्यात आलेले असून महारार्ष्ट शासनाने प्रदूषण होऊ नये म्हणून प्लास्टीक बंदी केलेली असल्यामुळे सोमठाणा गडावर प्लास्टीक, कॅरीबॅग न आणण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. पर्यावरणाचा ऱ्हास रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलेला आहे. यंदा प्रथमच गडावर संपूर्णपणे पाने व पळसाच्या पानाची पत्रावळी वापरण्यात येणार असून गडावर पॉलीथीन पिशळी, पाणी पाऊच, बीडी, सिगारेट, तंबाखू गुटखा न आणण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे. सोमठाणा येथील रेणुका देवी गडावरील नऊ दिवस चालणाऱ्या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विश्वस्त मंडळ तथा तालुक्यातील अनेक भावीक प्रयत्न करत असून प्रशासनाच्या वतीनने तहसीलदार छाया पवार तर पोलिस प्रशासनाच्या वतीने बदनापूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक रामेश्वर खनाळ लक्ष ठेऊन आहेत. नवरात्रोत्सवा दरम्यान या गडावर जालना तसेच संभाजीनगर जिल्हयातून हजारो भाविक राहुटया करून येथेच नऊ दिवस राहतात. त्यांच्या सोयीसाठीही संस्थानच्या वतीने प्रयत्न करण्यात येत आहे. नऊ दिवस तालुक्यातून अनेक भाविक सकाळी पायी या देवीच्या दर्शनासाठी येत असतात जवळपास 15 किलोमीटर परिसरातील भाविक दररोज सकाळी देवीच्या दर्शनासाठी पायी येथे येत असतात. सोमठाणा येथील गडावर नऊ दिवस भाविक राहुटया करून रहात असतात. यात अनेक वयोवृध्द भाविकांचा समावेश असतो. या सर्व भाविकांची सेवा करण्याच्या हेतूने तसेच त्यांना आरोग्य सेवा, पाणी-जेवण, फराळ याची व्यवस्था करण्याच्या हेतूने संभाजीनगरचे माजी नगरसेवक राजू अहिरे हे सर्व मित्रमंडळासह नऊ दिवस या गडावर राहणार असून या दरम्यान गडावर निवासी असलेल्या भाविकांना आरोग्य सेवा तसेच इतर सेवा पुरविणार आहेत. त्याचप्रमाणे येणाऱ्या भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणूनही शिवसैनिकांच्या वतीने मंदिर परिसरात स्वयंसेवकाचे जाळे निर्माण करण्यात येणार असल्याचे अहिरे यांनी सांगितले.