शक्तीपीठांना अभिवादन करण्यासाठी भाजपा महिला मोर्चाची बुधवारपासून यात्रा नवरात्रीच्या निमित्ताने राज्यातील शक्तीपीठांना व प्रेरणा केंद्रांना अभिवादन करण्यासाठी भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्र महिला मोर्चा अध्यक्षा ॲड. माधवी नाईक यांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या महिला कार्यकर्त्यांची ‘जागर आदिशक्तीचा, सन्मान नारीशक्तीचा’ ही 2200 किलोमीटरची यात्रा बुधवार दि. 10 ऑक्टोबर रोजी नाशिक येथे सुरू होत आहे. ॲड. माधवी नाईक यांनी सांगितले की, भाजपा महिला मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्ष विजया रहाटकर यांच्या उपस्थितीत नाशिक येथे यात्रा सुरू होत आहे. प्रदेश महिला मोर्चाच्या प्रभारी व प्रदेश सचिव उमा खापरे यावेळी उपस्थित असतील. नाशिक, अहमदनगर, बुलढाणा, परभणी, माहूर (नांदेड), उस्मानाबाद, कोल्हापूर व सातारा मार्गे 2200 किलोमीटरची यात्रा 10 ऑक्टोबर ते 17 ऑक्टोबर या कालावधीत महिला कार्यकर्त्या करणाऱ्या आहेत. भाजपा प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब पाटील दानवे एक दिवस यात्रेत सहभागी होऊन मार्गदर्शन करणार आहेत तर परभणी येथील कार्यक्रमात प्रदेश संघटनमंत्री विजयराव पुराणिक उपस्थित राहणार आहेत. नाशिकमध्ये सप्तशृंगी देवीचे दर्शन, चौंडी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना आदरांजली, सिंदखेडराजा येथे राजमाता जिजाऊंना प्रणाम, परभणी येथे संत जनाबाई यांचे स्मरण, नांदेडमध्ये भिमाई यांना नमन, उस्मानाबाद येथे राजमाता विजयाराजे शिंदे यांना आदरांजली, कोल्हापूर येथे ताराराणी यांना अभिवादन तर सातारा जिल्ह्यात सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचे स्मरण असे यात्रेतील कार्यक्रमाचे स्वरुप असेल. ठिकठिकाणी विविध क्षेत्रातील यशस्वी भगिनींचा सन्मान करण्यात येईल तसेच भाजपा सरकारने महिलांसाठी केलेल्या कामाची माहिती देण्यात येईल. शेतकरी महिला संमेलन, बचतगट मेळावा, आंगणवाडी सेविकांचा सन्मान, महिला किर्तनकारांचा सत्कार, अनुसूचित जाती – जमातींच्या महिलांसाठीच्या योजनांची माहिती देणारा मेळावा, महिला लोकप्रतिनिधी संमेलन, सैनिकांच्या विधवांचा सत्कार आणि विद्यार्थिनींचा मेळावा असा भरगच्च कार्यक्रम यात्रेदरम्यान आखलेला आहे. भाजपा महिला मोर्चा माजी राष्ट्रीय अध्यक्ष कांताताई नलावडे, माजी प्रदेशाध्यक्ष नीता केळकर व आ. स्मिता वाघ या यात्रेत सहभागी होणार आहेत. भाजपाच्या ठिकठिकाणच्या खासदार, आमदार, नगरसेविका, जिल्हा परिषद सदस्या आदी लोकप्रतिनिधी विविध ठिकाणी यात्रेमध्ये सहभागी होतील