'साध्यासरळ माणसाची भूमिका साकारणे सगळ्यात कठीण''- सोनी सबवरील बीचवाले-बापू देख रहे है या आगामी मालिकेतील पापाजी, मिथिलेश चतुर्वेदी प्र. सोनी सबवरील बीचवाले.. मालिकेतील तुमच्या व्यक्तिरेखेबद्दल थोडं सांगा मिथिलेश : पापाजी ही व्यक्ती जगण्याच्या कोलाहलापासून दूर आपले आयुष्य शांतपणे जगणारी आहे. त्यांना महत्त्वाकांक्षा नाहीत आणि बाहेरच्या जगाशी कसलाही संबंध न ठेवता, आयुष्य जसं जाईल तसं निवांतपणे पुढे जात राहणं हेच त्यांच्या आयुष्याचं प्रेयस आहे. ते आपल्या गतीने आयुष्य जगत आहेत आणि गांधीजींच्या तत्वांचं पालन करत आहेत. तो त्यांचा विचार आहे असं नाही, पण आपल्या वडिलांना त्यांनी सदैव तसंच वागताना पाहिलं आहे आणि पापाजी आपल्या कुटुंबालाही त्याच तत्वांचं पालन करायला लावत आहेत. प्र. सध्या टेलिव्हिजनवर सुरू असलेल्या इतर कार्यक्रमांच्या तुलनेत बीचवाले.. चं वेगळेपण काय आहे असं तुम्हाला वाटतं ? मिथिलेश : इतर वाहिन्यांवर नॉन-फिक्शन कार्यक्रम दाखवले जातात, ऐतिहासिक कार्यक्रम दाखवले जातात पण एखाद्याच्या सध्याच्या आयुष्यात काय सुरू आहे हे दाखवणारा एकही कार्यक्रम नाही. इतरत्र दिसणाऱ्या कार्यक्रमांमधला ऐवज वास्तवावर बेतलेला न वाटता कल्पनारम्य वाटतो. बीचवाले ही मालिका खूप प्रयत्नपूर्वक बनवली गेली आहे आणि उच्चवर्गीय आणि निम्नवर्गीय अशा दोन्ही वर्गांमध्ये न बसणारे मध्यमवर्गीय – 'बीचवाले' हे या कथेचा वस्तूविषय आहेत. आजच्या काळात मध्यमवर्गीय लोकांच्या आयुष्यात असलेल्या अडचणी, प्रश्न यावर ही मालिका भाष्य करते. देशाच्या आर्थिक किंवा राजकीय परिस्थितीमध्ये थोडेसे जरी चढउतार आले तर त्याचा सर्वाधिक परिणाम या बीचवाल्या माणसांवर अर्थात मध्यमवर्गावर होतो – या मालिकेमध्ये एक संवाद आहे. – ''बीचवाले तब भी मार खाते थे, और अब भी मार खाते हैं।'' प्र. तुम्ही या भूमिकाला होकार देण्यामागचे कारण काय? मिथिलेश : पहिली गोष्ट म्हणजे पापाजींची व्यक्तिरेखा खूप सरळसाधी असूनही तिच्या खूप साऱ्या छटा आहेत. खरं सांगायचं तर अशी साधी व्यक्तिरेखा चितारणं हे सर्वाधिक आव्हानात्मक काम असतं. आणि मला आव्हानं स्वीकारायला आवडतात. म्हणूनच या भूमिकेबद्दल विचारणा झाल्याझाल्या मी तिला होकार दिला. प्र. तुमच्या रोजच्या जगण्यात असा एखाद्या 'बीचवाला' प्रश्न आला आहे का? मिथिलेश : एकच का, माझ्या आयुष्यात अशा अनेक अडचणी आल्या आहेत. बीचवाले म्हणून आपण रोजच्या रोज अशा प्रश्नांना सामोरे जात असतो. फक्त मीच नव्हे तर माझे पूर्वजही बीचवालेच होते. औषधे असोत, भाजीपाला असो, इंधन असो, कशाचाही किंमती थोड्या जरी वाढल्या तरीही बीचवाल्यांवर त्याचा परिणाम होतो. मध्यमवर्गीय म्हणून जगताना एकूण एका प्रश्नाचा तुम्ही अगदी अथपासून इतिपर्यंत सामना करता. प्र. आमच्या प्रेक्षकांना काय संदेश द्याल? मिथिलेश : माझ्याकडे त्यांच्यासाठी फक्त एकच संदेश आहे. बीचवाले दरवेळी एखाद्या समस्येमध्ये पुरते अडकत असले तरीही तेच या समाजाचा सर्वात खंबीर आधार आहेत ही गोष्ट त्यांनी विसरू नये. त्यांनी ठरवलं तर ते हवं तेव्हा परिस्थिती पालटून टाकू शकतात. त्यांनी जागं व्हावं, स्वत:च्या परिस्थितीकडे पहावं आणि सुस्त पडलेल्या अजगराप्रमाणे तिथे ठिय्या मांडून बसण्याऐवजी तिच्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करावा हेच माझं त्यांना सांगणं आहे. प्र. प्रेक्षकांनी Sony SAB च्या बीचवाले... मालिकेकडून काय अपेक्षा ठेवावी? मिथिलेश : लोकांना जिथे आपल्या प्रश्नांचं आणि समस्यांचं प्रतिबिंब सापडतं अशाच मालिका त्यांना आपल्याशा वाटतात. आपले प्रश्न मांडले जाताना पाहण्यामध्ये आणि त्यांवर सुचवलेल्या उत्तरांमध्ये त्यांना रस असतो. माझ्यामते बीचवाले मालिकेमध्ये प्रत्येक टप्प्यावर त्यांना हीच गोष्ट पहायला मिळेल आणि कधी ना कधी त्यांच्या आयुष्यात घडलेले प्रसंग छोट्या पडद्यावर पुन्हा जिवंत होताना पाहण्यात त्यांना नक्कीच मौज वाटेल. प्र. : बॉलिवूड आणि टेलिव्हिजन यांच्यामधला सर्वात मोठ फरक कोणता ? मिथिलेश : चित्रपटांना वेळेचं बंधन असतं, एखादी गोष्ट तासा-दीड तासांत सांगण्याची गरज असते. टीव्ही कार्यक्रमांसाठी असं कोणतंही बंधन नाही. इथे गोष्टीचा मनसोक्त विस्तार करण्याची मुभा तुम्हाला मिळते.