वाद विवाद स्पर्धेत पार्थ कॉलेज विजयी औरंगाबाद - महात्मा गांधी जयंती निमित्त शांती नर्सिंग होम व मित्र ग्रुपतर्फे आयोजित आंतर महाविद्यालयीन वाद विवाद स्पर्धेत जालना जिल्ह्यातील नेर येथील पार्थ आर्टंस अँड सायन्स कॉलेजच्या आमिर सोहेल शेख व इरफान शेख यांनी बाजी मारली, तर निबंध स्पर्धेत जाफराबाद येथील सिध्दार्थ महाविद्यालयाच्या पौर्णिमा दाभाडे यांनी प्रथम क्रमांक पटकावला. आयएमए सभागृहात मंगळवारी सायंकाळी या स्पर्धेची अंतिम फेरी झाली. आंतर महाविद्यालयीन वाद विवाद स्पर्धेसाठी शेतकरी आत्महत्येचे कारण सामाजिक अपरिहार्यता हा विषय देण्यात आला होता. स्पर्धेत औरंगाबादसह शेजारी जिल्ह्यातील शैक्षणिक संस्थांमधील 106 संघानी सहभाग नोंदविला. यात विषयाची प्रभावी मांडणी करत जिल्ह्यातील नेर येथील पार्थ आर्टस अँड सायन्स कॉलेजच्या आमीर सोहेल शेख व इरफान शेख यांनी प्रथम क्रमांक पटकावला. उपजिल्हाधिकारी डॉ.अंजली धानोरकर, डॉ.विनायक पाटील, डॉ.विनय बार्‍हाळे यांच्या हस्ते विजेत्यांना फिरती ढाल, अकरा हजार रूपये आणि चषक प्रदान करण्यात आले. द्वितीय पारितोषिक देवगिरी कॉलेजच्या श्रुती पाटील व गौरी गिरी यांना मिळाले. तृतीय क्रमांकाचे बक्षीस एमजीएम चे महिमा गोमलाडू व प्रदीप धोंगडे यांनी पटकाविले. पुणे येथील सिंहगड लॉ कॉलेजच्या खुशबू खरंबदा हिला समीक्षक पुरस्कार जाहीर करण्यात आला. प्रमुख पाहुणे योगेंद्र बल्लाळ यांनी तिला हा पुरस्कार प्रदान केला. तर डॉ.अनुराधा बार्‍हाळे यांच्या हस्ते उत्कृष्ट वक्ता पुरस्कार आमीर सोहेल शेख यांना प्रदान करण्यात आला. मनोविकार तज्ज्ञ डॉ.काद्री, प्रदिप देशपांडे, अर्चना नरसापूरकर, श्रीकांत उमरीकर, संजीव शेलार आदि यावेळी उपस्थित होते. निबंध स्पर्धेत सिध्दार्थ कॉलेजची बाजी मनोविकांराची ओळख शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट असावी या विषयावर घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेत जाफ्राबाद येथील सिध्दार्थ महाविद्यालयाच्या पौर्णिमा दाभाडे व निकिता अंभोरे यांनी अनुक्रमे प्रथम व द्वितीय क्रमांक पटकाविला. विजेत्यांना डॉ.अजय महाजन तसेच धानोरकर यांनी बक्षीस प्रदान केले. तर तृतीय क्रमांकांचे बक्षीस बीड येथील एम.पी.मनोत कॉलेजच्या भाग्यश्री पवार यांनी मिळाले