जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाचे वतीने शौर्य दिन साजरा औरंगाबाद - भारतीय सैन्य दलाने 29 सप्टेंबर 2016 रोजी पाकिस्तान हद्दीत घुसून सर्जीकल स्ट्राईकव्दारे अतिरेक्यांचा खात्मा केला. भारतीय सैन्याची ही अभिमानस्पद कामगिरी राज्यातील जनतेपर्यंत व्यापक प्रसिध्दीव्दारे पोचविण्यासाठी व माजी सैनिकांचा सन्मान करण्यासाठी दि. 29 सप्टेंबर रोजी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय औरंगाबादच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकारी संजीव जाधवर, कर्नल रमेश वाघमारे (निवृत्त) यांच्या प्रमुख उपस्थितीत शौर्य दिन साजरा करण्यात आला.कार्यक्रमास उपजिल्हाधिकारी रिता मेत्रेवार, कर्नल जॉय डॅनियल (निवृत्त) रिजनल मॅनेजर, मेस्को औरंगाबाद विभाग यांच्यासह इतर संबंधित उपस्थित होते.कार्यक्रमाची सुरुवात दिपप्रज्वलन व शहीद सैनिकांना श्रध्दांजली देऊन झाली. कार्यक्रमात जिल्ह्यातील शहीद सैनिकांच्या वीरपत्नी, वीरमाता, वीरपिता, शौर्यपदक धारक सैनिकांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्तावीक प्रवींद बिरादार , जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी,यांनी केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख पाहुने यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करुन सैनिकां विषयी सार्थ अभिमान असल्याबाबत भावना व्यक्त केल्या. कार्यक्रमास जिल्ह्यातील माजी सैनिक, वीरपत्नी, वीरमाता, वीरपिता, त्यांचे अवलंबिता, पत्रकार बांधव व इतर नागरिकांची उपस्थिती होती. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली.