अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाची जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक संपन्न औरंगाबाद - कर्ज प्रकरणे स्वीकारण्यासाठी विविध कारणाने टाळाटाळ करणाऱ्या बँकांनी जास्तीत जास्त कर्ज प्रकरणे कोणतेही कारण न सांगता ते स्वीकारुन त्यावर योग्य ती कार्यवाही करण्याचे आवाहन अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांनी येथे केले. जिल्हाधिकारी कार्यालयात अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाची आढावा बैठक महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली त्यावेळी ते बोलत होते. बैठकीस जिल्हाधिकारी उदय चौधरी, निवासी उपजिल्हाधिकारी संजीव जाधवर, अग्रणी बँकेचे व्यवस्थापक प्रदीप कुतवळ, सहाय्यक संचालक निशांत सुर्यवंशी ,जिल्हा समन्वयक प्रवीण आगवन यांच्यासह राष्ट्रीयकृत बँक अधिकारी उपस्थितीत होते. बैठकीत अण्णासाहेब पाटील अर्थिक मागास विकास महामंडळ अंतर्गत नव्याने राबवित असलेल्या तीन कर्ज येाजनेचा तसेच बँक निहाय मंजूर प्रकरणे, नामंजूर प्रकरणे या विषयी आढावा घेण्यात आला. मार्जिन मणी संदर्भात अग्रणी बँक व्यवस्थापकांनी एक ठराव करुन तो निर्देशित करावा. तसेच सर्व्हिस एरिया बद्दल ठराव घेऊन तो लवकरात लवकर बँकांना निर्देशित करण्यास अध्यक्ष नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांनी संबंधितांना सुचित केले.जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी बँकांना आदेशित केले की LOI घेऊन बँकेत येणाऱ्या सर्व लाभार्थी यांचे कर्ज प्रकरणे स्वीकारुन त्यावरती योग्य ती कार्यवाही करावी. तसेच नविन उद्योजक असेल तर त्या व्यावसायिकाला 3 वर्षाच्या ITR ची आवश्यकता नाही असे LDM यांनी स्पष्ट केले. तसेच जिल्हा समन्वयक यांनी सर्व बँकांना विनंती केली की कर्ज मागणीसाठी आलेल्या लाभार्थ्यांस सहकार्य करावे. या वेळी राजर्षी छत्रपती शाहु महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृती योजना व डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना यांचाही आढावा घेण्यात आला.