स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण : टॉप 10 मध्ये महाराष्ट्रातील 3 जिल्हयांचा समावेश सातारा जिल्हा देशात सर्वोत्तम नवी दिल्ली, : स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण २०१८ अंतर्गत देशातील पहिल्या १० जिल्हयांमध्ये सातारा , नाशिक आणि सोलापूर या तीन जिल्हयांनी स्थान मिळविले असून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि केंद्रीय पेयजल व स्वच्छता मंत्री उमा भारती यांच्या हस्ते या जिल्हांचा आज दिल्ली येथे राष्ट्रीय सन्मान करण्यात आला. केंद्रीय पेयजल व स्वच्छता मंत्रालयाच्यावतीने ‘स्वच्छ सर्वेक्षण –ग्रामीण २०१८’ मोहिमे अंतर्गत दिनांक १ ते ३१ ऑगस्ट २०१८ पर्यंत देशभरातील सर्वच ७१८ जिल्हयांमध्ये स्वच्छ तेच्या विविध निकषांवर सर्वेक्षण करण्यात आले. निवड करण्यात आलेल्या जिल्हयांमध्ये १०० पैकी ९७.९० गुणांसह सातारा जिल्हा देशात प्रथम ठरला आहे. या जिल्हयासह ९६.३३ गुण मिळवून नाशिक ६ व्या स्थानावर राहीले आणि ९५.५५ गुणांसह सोलापूर जिल्हयाने १० वे स्थान मिळविले आहे. राष्ट्रपती भवनात आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सातारा जिल्हयाचा सन्मान करण्यात आला. तर केंद्रीय पेयजल व स्वच्छता मंत्री उमा भारती यांच्या हस्ते प्रवासी भारतीय केंद्र येथे नाशिक व सोलापूर जिल्हयांना सन्मानित करण्यात आले. महाराष्ट्रासाठी गौरवाची बाब ; अधिक जोमान कार्य करू : श्री बबनराव लोणीकर स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण २०१८ मध्ये देशात महाराष्ट्राने आपल्या कामाची वेगळी छाप सोडली आहे. आज महाराष्ट्रातील सातारा , नाशिक व सोलापूर जिल्हांचा सन्मान करण्यात आला ही महाराष्ट्रासाठी गौरवाची बाब आहे. राज्यात गेल्या तीन वर्षात ६० लाख स्वच्छतागृह बांधण्यात आली आहेत व संपूर्ण राज्य हागणदारी मुक्त झाले आहे. केंद्रीय पेयजल व स्वच्छता मंत्रालयाच्यावतीने दिल्लीत आयोजित चार दिवसीय आंतरराष्ट्रीय महात्मा गांधी स्वच्छता परिषदेत महाराष्ट्राच्या स्वच्छता विषयक कामाचे कौतुक झाले असून ही राज्यासाठी मोठी उपलब्धी आहे. येत्या काळात राज्य अधिक जोमाने कार्य करणार अशा भावना राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी यावेळी व्यक्त केल्या. मोबाईल ॲप प्रतिसादात नाशिक देशात प्रथम स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण- २०१८ मध्ये मोबाईल ॲप द्वारे ग्रामीण भागातून एकूण २ लाख २२ हजार ५५१ असा प्रतिसाद मिळवून नाशिक जिल्हा परिषदेने बाजी मारली असून देशात पहिला क्रमांक मिळविला आहे. तसेच देशात पश्चिम विभागात नाशिक जिल्हयाने एकूण गुणांकणात तिसरा क्रमांक पटकाविला आहे. या दोन्ही उपलब्धीसाठी जिल्हयाचा आज सुश्री मंत्री उमा भारती यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. नाशिक जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शितल उदय सांगळे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी हा पुरस्कार स्वीकारला राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर आणि अपर मुख्य सचिव श्यामलाल गोयल यावेळी उपस्थित होते सोलापूर मोबाईल ॲप प्रतिसादात देशात दुस-या क्रमांकावर वच्छ सर्वेक्षण ग्रामीण २०१८ मध्ये मोबाईल ॲप प्रतिसादात एकूण १ लाख ७४ हजार ४५६ प्रतिसादांसह सोलापूर जिल्हा परिषदेने बाजी मारली असून दुसरा क्रमांक पटकाविला आहे. या उपलब्धीसह एकूणात ९५.५५ गुणांसह उत्तम कामगिरी केल्यामुळे जिल्हयाचा आज सुश्री उमा भारती यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय मामा शिंदे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारूड यांनी हा पुरस्कार स्वीकारला. देशातील निवड झालेल्या १०० जिल्हयांमध्ये महाराष्ट्रातील ११ जिल्हयांचा समावेश ‘स्वच्छ सर्वेक्षण –ग्रामीण २०१८’ मोहिमे अंतर्गत विविध निकषांवर सर्वेक्षण करून १०० सर्वोत्तम जिल्हयांची निवड करण्यात आली. यात पहिल्या १० मध्ये ३ तर एकूणात महाराष्ट्रातील ११ जिल्हयांचा समावेश आहे. हे जिल्हे पुढील प्रमाणे. जिल्हयाचे नाव सातारा (गुणांकन १) नाशिक (गुणांकन ६) सोलापूर (गुणांकन १०) कोल्हापूर (गुणांकन ११) सिंधुदुर्ग (गुणांकन १२) सांगली (गुणांकन १६) रायगड (गुणांकन २६) अहमदनगर (गुणांकन ३७) रत्नागिरी (गुणांकन ३९) पुणे (गुणांकन ५१) उस्मानाबाद (गुणांकन ८३)